Subscribe Us

महिला कर्मचार्यांनी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा विकल्प देणे बाबत


 शासननिर्णय 

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करणेबाबत दिनांक १४.१२.२०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे सुधारीत आदेश देण्यात येत आहेत.

(१) महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहापश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या "आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या (आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्या नावांसह) वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे" असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक आहे. सदर अर्जासोबत संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबुन आहेत, याबाबतचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशनकार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. अविवाहीत महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवापुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही. परंतु, संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहीत असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील.

(२) संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वर नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी आई-वडील किंवा सासू सासरे या पैकी एकाच्या अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करुन संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सदर विकल्पाची (संबंधितांच्या नावासह व) दिनांकासह सेवापुस्तकात आठ दिवसांत नोंद घेणे आवश्यक राहील.

(३) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांने वरील (१) प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपुर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. म्हणजेच महिला कर्मचाऱ्याच्या विवाहापश्चात तिच्या संपुर्ण सेवा कालावधीत तिच्या आई-वडील किंवा सासू-सासरे या दोन जोडी पैकी केवळ एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. यापूर्वी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरीता ज्या विवाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वरील विकल्पाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात आलेली असेल, त्यांना प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने नव्याने विकल्पाची नोंद सेवापुस्तका घेण्याची आवश्यकता नाही.

(४) विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोन जोडी पैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी, संबंधित रुग्णास रुग्णालयात ज्या दिनांकास दाखल केलेले असेल, त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरील (१) प्रमाणे सेवापुस्तकात विकल्प नोंदविलेला असावा. तसेच सदर रुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबुन असल्याचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशन कार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) सेवापुस्तकातील विकल्पाच्या नोंदीसह सक्षम प्राधिकारी यांच्याकडे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी जोडणे बंधनकारक राहील.

(५) महिला कर्मचारी शासकीय सेवेत नव्याने/बदलीने रुजू होतेवेळी संबंधित आस्थापना अधिकारी यांनी उपरोक्त (१) प्रमाणे विहीत केलेली तरतूद संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणल्याची लेखी नोंद सेवापुस्तकात दिनांकासहीत घेण्याची दक्षता घ्यावी.

(६) वरील निर्देशांच्या अनुषंगाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबतचे प्रस्ताव विचारात घेताना, संदर्भीय दिनांक ०२.०८.२०१९ च्या शासन निर्णयान्वये वा त्या-त्या वेळी शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या आई-वडील वा सासू-सासरे यांचे अवलंबित्व ठरविताना निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेच्या तरतूदींचे अनुपालन होईल, याची संबंधित कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी.

२. हा शासन निर्णय, यापुर्वी विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणांत लागू राहणार नाही, किंवा निर्णित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरु करण्यात येणार नाहीत.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८०१११४९३६३२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. 

www.maharashtra.gov.in या

Post a Comment

0 Comments